Happy Womens Day


माझा मराठीची बोलू कौतुके !!!






माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर कवी सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा गायला आहे.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी 

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड कुसुमाग्रज म्हणजेजच वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवसमराठी भाषा दिवसम्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा वाढविण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे.त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला. पुढे अनेक श्रेष्ठ संत मंडळींनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजविले, फुलविले, मोठे केलेविसाव्या,एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केलीपण हीच आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते आहे. हे विधान सर्वत्र ऐकायला मिळते. आणि ह्या मागे एक आर्त कळकळ असते ती आपल्या मातृभाषेवरील प्रेमाचीआस्थेची .
मुळात भाषा कशासाठी ?
संवाद साधण्यासाठी, भावना, विचार मांडण्यासाठी, ते जतन  करून ठेवण्यासाठीविकासासाठी. आणि मग जेव्हा हीच भाषा मागे पडते तेव्हा फक्त भाषा नाही तर एक संपूर्ण मानव समुह , एक संस्कृती मागे पडते.
बदलाच्या, काळाच्या ओघामध्ये पुढे जाणे गरजेचेच आहे परंतु आपल्या भाषेला धरून राहणे तितकेच महत्त्वाचे आहे . इतर भाषांचा राग किंवा द्वेष नाही परंतु आपल्या मराठी भाषेचा अभिमान जरूर असावा. दोन वाक्यांमध्येही सर्रास इंग्रजी शब्द वापरले जातात. कधी तो कामाचा भाग असतो तर कधी प्रतिष्ठेचा!
अनेकदा आपणमॉडर्नआहोत हे दाखवायला इत्तर भाषांचा हात पकडला जातो . त्यामुळे आपल्याकडे एकाही भाषेत अस्खलित बोलण्याचं कौशल्य उरत नाही.
 कामाच्या ठिकाणी सर्व भाषिक काम करतात. दिवसाचे दहा तास आपण ऑफिसमध्ये असतो. त्यामुळे एक ठरावीक मर्यादेपर्यंत इंग्रजी शब्दांचा वापर केला तर काहीच हरकत नाही. परंतु जिथे शक्य असेल तिथे मराठीत बोलायला काय हरकत आहे. परंतु मराठीत बोलणे हे आजकाल मागासलेले समजले जाते. ज्या संस्कृत भाषेतून सर्व भाषांचा उगम झाला त्याच मारहती भाषेत बोलण्याची लाज वाटणाऱ्यांना माझा नमस्कार !!! आपल्या मातृभाषेची लाज वाटणे ह्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ???
भाषा हि मुळात संवादासाठी असल्यामुळे आग्रह कुठे आणि किती असावा हे आपल्याला कळले पाहिजे . स्वतः  कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी,
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका!

भाषेच्या वृद्धीपेक्षा समृद्धी अधिक महत्त्वाची आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडानी म्हणावे.?
हल्ली दिवस साजरे करणे खूप सहज शक्य झाले आहे परंतु ते साजरे होण्यापेक्षा ते जगणे हे महत्त्वाचे आहे . मराठी भाषेचा गोडवा गावा तेवढा थोडाच आहे. तो केवळ शब्दांनी गाऊन चालणार नाही तर कृतीतही आणायला हवा.
मराठी भाषा दिवस’  निमित्ताने आपल्या मायबोलीचा झेंडा उंच आकाशात सदैव  फडकत राहो हीच इच्छा !!!

- सुप्रिया नार्वेकर

नेताजी - हुशार विद्यार्थी



नेताजी - हुशार विद्यार्थी

"प्रत्यक्ष मित्र " मधील "नेताजींच्या लेखमाला"  म्हणजे सुभाषबाबूंचा जीवनपटच आहे ,
हळूहळू नेताजींचा स्वभाव , त्यांचे कार्य आपल्याला अनुभवायला मिळते .
क्रांतीकरिता सोडून शिक्षण आणि व्यावसायिक प्रगती ह्याकडे नेताजींनी लक्ष केंद्रित करावे असे नेताजींच्या वडिलांना म्हणजेच जानकीनाथ ह्यांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांचे सर्वोत्तपरी प्रयत्न चालू होते. पण नेताजीसुद्धा हार मानण्यातले नव्हते. वडिलांनी सांगितल्यानंतर दिवस रात्र एक करून नेताजींनी मेट्रिकची परीक्षा दिली आणि दुसरा क्रमांक मिळवला .
नेताजींच्या मनातून क्रांतिकारीता जावी म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी  नेताजींचे मोठे बंधू शरद ह्यांच्याकडे कोलकात्याला पाठिविण्याचा
निर्णय घेतला .
 पण सूर्याचे तेज झाकता येत नाही तसेच काहीही  केले तरी नेताजींच्या मनात पेटलेली स्वातंत्र्याची ठिणगी विझणार नव्हती .
कटक मध्ये वडिलांनी दिलेल्या समजुतीमुळे नेताजींनी गुरूचा शोध थांबविला होता परंतु तो त्यांनी पुन्हा जोमाने सुरु केला. त्या काळी आपल्या भारताची परिस्थिती फार हलाखीची होती. खरे तर समाज हा भारताचा महत्त्वाचा हिस्सा आहे आणि तोच जर दुर्लक्षित आणि हलाखीत राहिला तर भारताचे स्वातंत्र्य आणि प्रगती कठीण आहे हे नेताजींना माहित होते . आपल्या मातृभूमीची हि अवस्था पाहून सुभाषबाबू खूप कष्टी होत असत .
अधिक माहितीसाठी वाचा 

- सुप्रिया नार्वेकर
संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र



आता प्रत्यक्ष मित्र एका क्लिकमध्ये
डाउनलोड करा प्रत्यक्ष ऍप 

एक सलाम...

Indianarmysoldier

जागतिक जल दिन



 जागतिक जल दिन 
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

कवी बा. भ. बोरकरांची वाचनात आलेली हि कविता .पाण्याचे महत्त्व सांगून जाते .
आजकाल आपण मोठ्या उत्साहाने आपले सगळे सण समारंभ, वेगवेगळे days साजरे करतो . पण ज्याला "जीवन " असे नाव दिले तो "जागतिक जल दिन " आपणअगदी सहजरीत्या विसरलो .
शाळेत असताना "पाणी वाचवा " ह्यावर निबंध लिहायचो. तेव्हा त्याचे महत्त्व तितकेसे कळले नाही .पण आज या वर्षी संपूर्ण भारतभर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.सध्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ पडत असे.परंतु या वर्षी पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलेला आहे.



त्या निबंधाची खरी व्याख्या आज कळते आहे .
गुण मिळवण्यापुरताच काय तो पाणी वाचवण्याचा अभ्यास .
पाणी वाचवण्याच्या निरनिराळ्या पद्धती ह्या फक्त वही मध्येच मर्यादित राहिल्या .
माझ्या कडून सुद्धा काही वेळी पाण्याचा अपव्यय होतो पण आजपासून तो कटाक्षाने टाळणार.
कालच एका मराठी कार्यक्रमात एका व्यक्तीचा उल्लेख केला गेला "अबीद सुरती " म्हणून जे वयाच्या ८० व्या वर्षी मुंबई मधील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन, परवानगी घेऊन ,आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्लंबर घेऊन नळांची गळती दुरुस्त करतात .खूप कौतुक वाटले ऐकून .
जर वयाच्या ८० व्या वर्षी ते एवढा विचार करू शकतात तर आपण का नाही ?
कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात हि स्वतःपासून करावी .
दैनंदिन जीवनात आपण किती पाण्याचा अपव्यय करतो . 

आंघोळीपासून, कपडे भांडी , गाडी धुणे हे आणि बरंच काही .
हे आपण टाळू शकतो .
सध्या लग्न कार्य किंवा इतर समारंभात पाण्याचे बंद ग्लास दिले जातात आणि मग कित्येक वेळा २ घोट पिउन ते फेकून दिले जातात . 

किती प्रमाणात पाणी वाया जाते . 
हेच जर का आपण बंद पाण्याचे नळ असलेले कॅन आणि ग्लास ठेवले आणि प्रत्यकाने गरजे इतकेच पाणी घेतले तर काही प्रमाणात आपण  पाण्याचा अपव्यय टाळू शकतो आणि स्वच्छतेची चिंता नाही . 

 भारतीय संस्कृतीमध्ये आपण गंगा , नर्मदा ,गोदावरी ,कृष्णा माई ह्यांना पवित्र मानतो , त्यांची पूजा करतो परंतु त्याच नद्यांचे होणारे आणि वाढते प्रदूषण हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे . 

आपण तलाव ,नदी समुद्र ह्यांच्या बाजूला निर्माल्यासाठी कलश ठेवलेले पाहतो परंतु तरीही काही चुकीच्या अंधश्रद्धेपोटी कित्येक जण पाण्यामध्येच विसर्जन करतात. 

इको -फ्रेंडली ऐवजी प्लास्टर ऑफ परिस च्या मुर्त्या वापरून आपण जल प्रदूषणात भर घालतो .
होळी - रंगपंचमी ह्या दिवशी कित्येक लिटर पाणी आपण वाया घालवतो .
ह्याचा अर्थ सण साजरे करू नये असा नाही तर सुक्या रंगानी सुद्धा आपण होळी खेळू शकतो .पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न करता साजरे करणाऱ्या प्रत्येक सणाचा आनंद हा खूप लाख मोलाचा असेल .
कित्येकदा आपण आदल्या दिवशीचे पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देतो आणि ताजे पाणी भरतो परंतु हे करत असताना फक्त विचार करा कि अनेक गावांमध्ये एक हंडा पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागते.



आपण पाणी वाचवण्यासाठी नवनवीन तंत्र विकसित करतो पण ती प्रत्यक्षात उतरायला मात्र वर्षानुवर्षे निघून जातात . त्यापेक्षा प्रत्येकाने जर पाणी जपून वापरण्याचे ठरवले आणि पाण्याचा अपव्यय टाळला तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर पाणी बचत करू शकतो. झाडे लावण्यापासून ते कुपनलीकेपर्यंत अनेक पर्यायाने जल संवर्धन करता येऊ शकते . 
पाणी हा आज पृथ्वीवरील जीवनावश्यक घटक आहे.प्रत्येक जीवाला पाणी हे अत्यावश्यक आहे .हेच जर असेच सुरु राहिले तर पाण्यावरून पुढील काळात संघर्ष पहावयास मिळतील.त्यामुळे पाणी जपून वापरणे व पाण्याचा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.
आपण सगळीकडे स्त्री साक्षरता , प्रौढ साक्षरता मोहीम पाहतो . पण खऱ्या अर्थाने आता जल साक्षरता मोहीम राबविण्याची खरी गरज आहे .
आज जागतिक जल दिनानिमित्त आपण प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळण्याची प्रतिज्ञा करूया.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे "
-सुप्रिया नार्वेकर 

happy Valentines Day !!!

Happy Valentines Day

शाई -Printing Industry ची नस

Ink

    शाई -Printing Industry ची नस

लहानपणी शाळेत असताना आम्हाला तिसरी आणि चौथीला निबंध लिहिण्यासाठी फक्त शाईचे पेन वापरण्याचे बंधन होते. मग काय सुबक अशी दौत आणि त्याबरोबरचे ते शाईचे पेन .
ink bottle

निराळेच अप्रूप होते ते !!!
शाईचा संबंध काय तो एवढाच .
पुढे पेन आणि पेनाची रिफील इतकंच काय ते शाईचे दैनंदिन व्यवहारातील येणे जाणे.
पण पुढे जेव्हा नोकरी संदर्भात printing क्षेत्रात आले तेव्हा शाईचे महत्त्व लक्षात आले .
छोट्याश्या दौतीमधल्या शाईची उत्क्रांती वाखाण्याजोगी आहे .
थोडासा इतिहास पहिला तर-
पूर्वी जास्त प्रमाणात काळ्या रंगाच्या शाईचा वापर केला जात असे.
चांगल्या दर्जाच्या लाखेचा वापर करून त्यावर रासायनिक पक्रिया करून शाई बनवली जात असे.
दिव्यांच्या काजळीचाही शाई म्हणून वापर केला जात असे.
त्याचबरोबर गेरू , कुंकू , हळद हेसुद्धा पर्याय उपलब्ध होते .
विचार करा जर शाईचा शोध लागला नसता तर काय आपण दगडांवर रेघोट्या ओढत बसलो असतो का ?
२१ व्या शतकात आहे का ते शक्य ?
शाई आणि तिचे प्रकार हे तांत्रिकदृष्ट्या पहायला गेलो तर फार किचकट आहेत .
म्हणून शाई मधले काही खास प्रकार आपण पाहू .
सर्वसामान्यपणे वापरात येणारी प्रिंटींगची प्रक्रिया म्हणजे ऑफसेट प्रिंटींग.
ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये ३ प्रमुख घटक असतात .
१) पिगमेंट
२) वेहिकल
३) मोडिफायर 

ह्याची थोडक्यात ओळख करून घेऊ
१) पिगमेंट
साधारणत: पिगमेंट २ प्रकारचे असतात .
i ) ओरगानिक पिगमेंट -
हे काळी शाई बनवण्यासाठी कार्बन पासून तयार केले जाते .
ii ) इनओरगानिक पिगमेंट -
वेगेवेगळ्यारंगांच्या शाई बनवण्यासाठी हे वापरले जाते
२) वेहिकल -
हे असे द्रव्य आहे जे पिगमेंटचे कण घट्ट धरून ठेवते आणि कागदावर नेण्यास सहकार्य करते .
३) मोडिफायर
हा असा घटक आहे जो शाई सुकण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो त्याचप्रमाणे शाईला येणारा वास आणि रंग पसरणे ह्याला प्रतिकार करतो'
 
आपल्या नजरेत कधी आले असेल एखादी लग्नपत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका असते त्याला
एक सुगंध येतो . हि कमाल शाईचीच.
Fragrance  Ink असे सर्वसामान्य भाषेत संबोधले आहे .
ह्या शाईमध्ये Fragrance Oil वापरले जाते .
Printing ची  पूर्ण झाल्यानंतर ह्या oil चा वापर केला जातो .
अजून खास म्हणजे -
कधी कधी काही चित्र आपल्याला सामान्य प्रकाशात दिसत नाहीत पण त्यावर ultra - violet rays चा प्रखर मारा झाला किंवा सूर्य प्रकाशाशी थेट संबंध आला कि दिसून येतात . हि कला सुद्धा शाईचीच.
ह्यामध्ये back-light ink वापरली जाते .
तुम्ही कधी जादूचा मग पहिला आहे का ?
बाजारात आता सहज उपलब्ध होतात .
मला माझ्या office मधून गिफ्ट मिळाला आहे …
हा मग बाहेरून पूर्णपणे काळा असतो .
पण जेव्हा तुम्ही त्यामध्ये गरम चहा किंवा पाणी ओतता तेव्हा हळूहळू त्यावरील चित्र दिसायला सुरुवात होते .
हि जादू आहे एका विशिष्ट प्रकारच्या शाईचीच.
magic mug
ती म्हणजे Oxidised Ink .
असा हा जादूचा मग आपल्या प्रियजनांना किती आनंद देईल .
खोलात शिरलो तर खूप माहिती आहे आणि थोडी क्लिष्ट सुद्धा .
ह्या लेखामुळे सर्वांना शाईचे महत्त्व मात्र नक्कीच कळेल .

सुप्रिया नार्वेकर 

Road Safety

article


Road Safety

३१ जानेवारीची रविवारची सकाळ हि मुंबईसाठी वेगळीच होती .
पहाटे ६ वाजल्यापासून western express highway वर  bikes ची धाव दिसत होती . 
निमित्त होते.
आपल्या RTO तर्फे  "ROAD SAFETY RALLY 2016 "चे आयोजनचे.
लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला सुद्धा ह्याची नोंद घ्यावी लागली इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रयासांना यश मिळाले.
मीसुद्धा ह्या  "Rally" चा एक भाग होते.
खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी .
ह्या rally चा  मुख्य उद्देश होता सुरक्षा !!!
कोणाची ???
तुमची ,आमची,आपल्या कुटुंबाची,आपल्या मित्र परिवाराची ,
म्हणजेच आपल्या समाजाची .
आजच्या काळामध्ये प्रवास हा महाग झाला आहे .
पैशाने पण खऱ्या अर्थाने म्हणायला गेलो तर आपल्या जीवाच्या किमतीने .
रोज आपण वर्तमानपत्र , दूरदर्शन ह्यामध्ये बातम्या वाचतो . निदान एकतरी बातमी हिअपघाताची असते .
परंतु आपल्या बाबतीत घडले नाही ना मग परमेश्वराचे आभार मानून नजरेआड करून आपण विसरतो .
पण ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे त्याच्याशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
किंबहुना आपल्या चुकीमुळे दुसऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा आपल्याला काय अधिकार ?
RTO आयोजित केलेल्या ह्या Rally मध्ये काही गोष्टी ह्या सतत सांगितल्या जात होत्या .
हेल्मेट घाला ,
ते पूर्णपणे बंद असू द्या ,
पायामध्ये शूज असले पाहिजे ,
गाडीचे आरसे हे असलेच पाहिजेत आणि तेसुद्धा व्यवस्थितच पाहिजेत.
गाडी चालवताना सीट बेल्ट हे प्रत्येकासाठी आवश्यकच आहे .
गाडीचे license मिळवताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात पण त्या किती प्रमाणात कटाक्षाने पाळल्या जातात हे माहित नाही .
दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे कमी न होता वाढतच जात आहे .
ह्यामागचे गांभीर्य आपण सहज नजरेआड करतो .
वाहतुकीचे नियम हे फक्त कागदोपत्री न राहता ते अमलात पण आणले गेले पाहिजे.
रस्त्याने जाताना आपण ठिकठिकाणी वाहतूक सुरक्षा चे फलक पाहतो .
RTO कडून नेहमी सेमिनार आयोजित केले जतात .
दूरदर्शन वर जाहिराती प्रसारित केल्या जातात .
पण आपल्या सुरक्षेसाठी कोणी काही सांगावे किंवा करावे ह्याची वाट का बघा.
सुरुवातीला दुचाकी चा विचार करूया .
काही गोष्टी ह्या आपण वारंवार ऐकतो पण त्यामागचा हेतू काय असतो ते आपण बघूया .
पहिले म्हणजे सगळ्यांनाच परिचयाचे असलेले हेल्मेट.
ते फक्त दुचाकी चालवण्यासाठी नाही तर मागे बसणाऱ्यासाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहे .
आणि तेसुद्धा पूर्णपणे बंद .
खूप वेळा दुचाकी वर मागे बसलेली व्यक्ती हि हेल्मेट घालत नाही.
पण अपघातांचे प्रमाण पाहता चालवणाऱ्यापेक्षा मागे बसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे .
त्यामुळे प्रत्येक वाहकाने हि स्वताची जबाबदारी समजून आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी. 
जर आपल्याला अपघात झाला तर जास्त प्रमाण हे डोक्यावर आघात
होण्याचे असते आणि जर हेल्मेट नसेल तर मृत्यूची शक्यता जास्त असते .
त्याचप्रमाणे ते बंद असण्याचे कारण असे कि चालवताना धूळ डोळ्यात जाऊन आपल्याला दिसू नये अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अपघात होऊ शकतो .अजून एक महात्त्त्वाची गोष्ट म्हणजे बंद हेल्मेट आपली मानेची शीर सुरक्षित ठेवते .
त्यामुळे जर अपघात झाला तर आपला जीव वाचू शकतो .
दुसरी गोष्ट जी अगदी सहजपणे दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे
शूज .
खूप वेळा आपण चप्पल , मुली उंच खोटांचे बूट घालून दुचाकी चालवताना पाहतो .
पण खरे पाहता बाईकच्या लीवरची रचना हि बुटांच्या आकारानेच केलेलि असते .
आणि चालवताना खडे लागून आपल्याला ईजा होऊ नये हाही एक त्यामागचा उद्देश.
म्हणून दुचाकी चालवताना शक्यतो शूजच वापरावे .
हेल्मेट आणि शूज हेसुद्धा जर उत्तम दर्जाचे असतील तर चांगले .
तिसरी गोष्ट सिग्नल .
सिग्नल तोडणे हे म्हणजे अगदी रोजचेच झाले आहे .
पण ते तोडून आपण आपलाच आणि आपल्याबरोबर इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालतो .
चौथी गोष्ट वेग .
घाई हि प्रत्येकालाच असते .
पण आपल्या जिवापेक्षा नक्कीच जास्त नाही ना ???
अजून काही गोष्टी आहेत त्या म्हणजे जर दुचाकी चालवताना आपण jacket आणि gloves घातले तर ते केव्हाही चांगले असते .
jacket जेव्हा आपण चालवत असतो तेव्हा वाऱ्याचा आपल्या शरीरावर होणारा थेट प्रभाव हा रोकण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा येत नाहीआणि gloves हे आपल्या हातांचा धुळीपासून सांभाळ करतात, त्याचप्रमाणे चालवताना जर आपल्याला घाम आला तर आपली बाईक वरची पकड सैल होऊ शकते. म्हणून शक्यतो ह्या गोष्टी असणे चांगले. helmet, jacket आणि gloves हे सोडले तर हे सारे नियम  चार चाकी गाडीसाठी सुद्धा तितकेच बंधनकारक आहेत.
गाडीमध्ये seat belt हे प्रत्येकासाठी असतात फक्त लावले किती जातात हे प्रत्येकाला माहित .
ह्या सर्व गोष्टींबरोबर काही गोष्टी ह्या महात्तावाच्या आहेत ते म्हणजे
कोणतेही वाहन चालवत असताना mobile वर न बोलणे ,
कानात headphone लावून गाडी न ऐकणे आणि आपल्याबरोबर driving license आणि गाडीची सर्व कागदपत्रे नेहमी असणे .
जेणेकरून आपण अपघातांना आळा घालू शकतो आणि जर अपघात झालाच तर असलेल्या कागदपत्रांमुळे आपली ओळख पटणे आणि आपल्या कुटुंबाला आपली माहिती कळवणे सोयीचे होते .
हे सर्व जर प्रत्येक वाहकाने काटेकोर पणे पाळले तर पुढे येणाऱ्या वर्षात अपघातांची संख्या आपण नक्कीच कमी करू शकतो.
कारण अपघाताने आपण स्वतःचे , आपल्या कुटुंबाचे नुकसान करतोच पण आपल्या आणि सरकारच्या property चे पण नुकसान करतो .
आपल्यापैकी कित्येक  जणांच्या फोन ला पासवर्ड असतो .
पण सहसा तो नसावा कारण आपल्या फोनमधून आपल्या निकटवर्तीयांना फोन करणे सोयीचे होते .
अजून एक खूप महत्तवाची सुविधा आपल्या सरकारकडून सुरु करण्यात आली आहे .
ती म्हणजे एका sms द्वारा तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती मिळू शकते.
त्यासाठी  
७७३८२९९८९९ ह्या नंबर वर
VAHAN space vehicle number हे type करून पाठवायचे आहे .
त्यावरून तुम्हाला तुमच्या गाडीची माहिती मिळते तुमच्या नावासकट .
आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे कारण जर तुमची गाडी नसले परंतु रस्त्याने जाताना तुम्हाला
अपघात झालेला दिसला तर आणि मालकाबद्दल काही माहिती मिळत नसेल तर ह्या सेवेद्वारे तुम्ही
ती माहिती मिळवू शकता .
आपण आपल्या समाजाचे देणे लागतो आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने सतर्क असणे आणि सगळे नियम काटेकोरपणे पाळणे हे अत्यावश्यक असते .
शेवटी आपला जीव हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे .

सर्व जण पाळूया वाहतुकीचे नियम 
कशाला जवळ येईल मग तुमच्या यम

                                                                              -सुप्रिया नार्वेकर