Thank You नावाचे तिळगुळ !!!

"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला "

आजचा दिवससुद्धा नेहमीसारखाच सुरु झाला. ऑफिसला जाण्यासाठी नेहमीची बस पकडली. गेली ३ वर्षे ह्याच बसने प्रवास करतेय, पण आजचे conductor काका वेगळे होते. गर्दीही फारशी नव्हती आज. तिकीट देण्यासाठी ते माझ्याकडे आले , नेहमीचे नसल्यामुळे त्यांना stop चे नाव सांगून १२ रुपये दिले, त्यांनी machine मधून तिकीट फाडले आणि मला दिले, ते घेताना माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना  " Thank You " बोलले. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते पुढे निघून जायला हवे होते पण ते तिथेच थांबले. मी त्यांच्याकडे पाहिले , मला वाटले काही राहिले का ? पण ते माझ्याकडे पाहत म्हणाले " बाळा मला माझ्या ह्या नोकरीत आजपर्यंत कोणी तिकीट दिल्यानंतर "Thank You " नाही बोलले. उलट सुट्टे पैसे मागितले, पुढे जा म्हणालो तर उद्धटासारखी उत्तरे मिळतात. पण तू बोललीस , नेहमी सुखी आणि आनंदी राहशील." आणि ते पुढे गेले.

ते पुढे निघून गेले पण मी मात्र त्याच विचारात रहिले.
" Thank You " म्हणणे हि माझी फार पूर्वीपासूनची सवय आहे. मग ते Bus Conductor असो, रेल्वेचे तिकीट देणारे असो , auto वाला किंवा taxi वाला किंवा दुकानदार असो.
पण आज एक गोष्ट समजली कि माझ्या " Thank You " बोलण्याने मी एक क्षण का होईना कोणालातरी आनंद देऊ शकले, समाधान देऊ शकले आणि त्याने माझ्या मनाला दुप्पट / तिप्पट समाधान मिळाले. प्रेम दिल्याने वाढते ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.
हेच प्रेम देण्यासाठी पैशांची किंवा वेगळे काही कष्ट घेण्याची गरज नाही.  फक्त आपली वाणी रसाळ असावी. शब्द नाती जोडतात आणि तोडतातही.
त्यामुळे एखाद्याशी कटू बोलण्यापेक्षा थोडे गोड बोललो तर आपलं काहीच बिघडत नाही.

योगायोगाने आजचा दिवस आहे "मकर संक्रांतीचा " !!!
सगळे एकमेकांना "तिळगुळ घ्या गोड गोड बोला " ह्या शुभेच्छा देत  आहेत पण हे फक्त messages पुरते मर्यादित न रहाता खऱ्या जीवनात पण तो रसाळपणा आणि ते माधुर्य आले तर जीवन पण किती सुंदर होईल ना !!!
तिळगुळाच्या हलव्यालासुद्धा धार असते पण ती धार सुद्धा एकदा का जीभेशी मैत्री झाली कि विरघळून फक्त गोडवाच देते.
तसच विचारांचे आहे जर आपल्या चांगल्या विचारांची मैत्री योग्य शब्दांशी झाली तर त्यातून फक्त प्रेमच निर्माण होईल.
प. पू. बापूंनी २५ डिसेम्बर २०१४ च्या प्रवचनात सांगितले कि " २०१५ च्या नवीन वर्षाचा संकल्प करूया - प्रेम देण्याचा. ह्या वर्षी आपण थोडे तरी प्रेम द्यायला शिकूया."
आणि आजच्या ह्या अनुभवामुळे हा संकल्प मनात कोरला गेला. नुसते मकरसंक्रातीला गोड बोलण्यापेक्षा हे रसमाधुर्य आयुष्यभर जपले पाहिजे. प्रेम किंवा आनंद दिल्याने वाढतो , कमी होत नाही.
"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला "

- सुप्रिया नार्वेकर

15 comments: