दिवाळी अन नात्याचे बंध






                      दिवाळी अन नात्याचे बंध

उठा उठा दिवाळी आली
मोती स्नानाची वेळ आली…
         हि जाहिरात खूपच प्रसिद्ध झाली. त्यावर खूप विनोदही झाले. अलार्म काका संपूर्ण मजल्याला उठवायचे परंतु वयोमानानुसार त्यांना शक्य नसल्यामुळे त्याच्या शेजारी राहणारा एक छोटासा मुलगा त्यांची परंपरा पुढे चालू ठेवतो. जर दिवाळी दोन शेजाऱ्यांमध्ये प्रेमाचा धागा निर्माण करू शकते 
तर सख्खी नाती किती घट्ट विणली जातील ???

    खरे पहाता सर्व सण, उत्सव हे नाती जपण्यासाठी असतात. वर्षाची सुरुवातच आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला ने करतो आणि वर्ष सरते ते सुद्धा दिवाळी सारख्या नाती फुलवणाऱ्या उत्सवाने !!!
ऑक्टोबरच्या उन्हाच्या काहीलीवारती दिवाळीचा सण आनंदाची, नव्या उत्साहाची फुंकर मारतो. दिवाळीचे हे दिवस म्हणजे सगळीकडे उत्साह, आनंद, चैतन्य आणि प्रेम!!!
सारा परिसर कंदील, रंगीबेरंगी दिव्यांची तोरणे ह्याने लखलखून निघालेला असतो. हा उत्साह फक्त बाहेरुनच नाही तर प्रत्येक घराघरांत दिसून येतो. ह्या उत्साहाला साथ असते ती प्रेमाची, प्रेमाने बांधलेल्या नात्यांची.
    आयुष्यभर जपलेल्या ह्या नात्यांचा एक सुंदर मेळ दिवाळीला आपल्याला दिसून येतो. आजही आम्ही भावंडे एकत्र येउन कंदील बनवतो आणि तो सुद्धा प्रत्येकाच्या सहभागाने. जसे एकाने कंदिलासाठी लागणाऱ्या काठ्या तासायाच्या, एकाने करंज्या बनवायच्या, एकाने सोनेरी पट्ट्या, गोंडे तर एकाने शेपट्या बनवायच्या. अशा प्रकारे हा प्रेमाची गुंफण झालेला सुंदर असा कंदिल आनंदाचा प्रकाश चोहिकडे पसरवतो. घरातली मंडळी जेव्हा एकत्र बसून फराळ बनवतात नं ते बनवताना होणारा कल्ला आणि एकदा का तो बनवून झाला की, मग त्यावर पडलेला फडशा…. ह्या साऱ्याची गम्मतच न्यारी असते. वर्षभर आपण सारे आपापल्या नोकरी, व्यवसायमध्ये व्यस्त असतो. पण दिवाळीची ही ३-४ दिवसांची सुट्टी संपूर्ण वर्षभराचा आनंद देऊन जाते.
    दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरातली मोठी  स्त्री म्हणजेच आई-आजी घरातल्या सर्व मंडळींना ओवाळते व उटणं लावते; त्यातून तीचे घरच्या लोकांवर असणारे प्रेम दिसून येते तर पाडव्याला घरातील सगळी मंडळी एकत्र बसून फराळ करतात. तर भाऊबीजेला इतर नातेवाईक एकत्र येउन साऱ्या भावंडांची धमाल नात्यांचे हे रेशमी बंध अजून घट्ट करते. दिवाळीचा फराळ सुद्धा आपल्याला नात्यांचा गोडवा जपायला शिकवतो. जसे लाडवाचा गोडवा, करंज्यांचा,खुसखुशीतपणा,शेव,चकली,चिवड्याचा तिखटपणा, शंकरापाळीचा कडक पण तितकाच गोडवा आपल्याला नाती जपायला सांगतो. रांगोळीचे विविध रंगांमध्ये नातीसुद्धा रंगून निघतात. म्हणून कितीही व्यस्त असलो तरी दिवाळी सर्वांना एकत्र आणते, भरभरून आनंद देते. नात्यांचे नवे बंध बांधतेच तर कधी हे बंध अधिक घट्ट करते.   
    मुळात हे वातावरणच इतके प्रसन्न असते की द्वेष, मत्सर, वाईट विचार ह्यांचा कुठे अंशही नसतो. असतो तो फक्त उत्साह, प्रेम, आनंद, चैतन्य… 
तुम्हा सर्वांना सुद्धा ही दिवाळी सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चांगल्या आरोग्याची आणि
विशेषतः घट्ट प्रेमळ नात्यांची जावो हिच सदिच्छा !!!
कारण नाती टिकवायची नसतात ती जपायची असतात.
दिवाळी म्हणजे आनंद
दिवाळी म्हणजे उत्साह
दिवाळी म्हणजे चैतन्य
दिवाळी म्हणजे तेजोमय वातावरण
दिवाळी म्हणजे नात्याची गुंफण
दिवाळी म्हणजे प्रेमाचे बंधन

- सुप्रिया नार्वेकर

0 comments: