जागतिक जल दिन



 जागतिक जल दिन 
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

कवी बा. भ. बोरकरांची वाचनात आलेली हि कविता .पाण्याचे महत्त्व सांगून जाते .
आजकाल आपण मोठ्या उत्साहाने आपले सगळे सण समारंभ, वेगवेगळे days साजरे करतो . पण ज्याला "जीवन " असे नाव दिले तो "जागतिक जल दिन " आपणअगदी सहजरीत्या विसरलो .
शाळेत असताना "पाणी वाचवा " ह्यावर निबंध लिहायचो. तेव्हा त्याचे महत्त्व तितकेसे कळले नाही .पण आज या वर्षी संपूर्ण भारतभर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.सध्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्वी मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ पडत असे.परंतु या वर्षी पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसलेला आहे.



त्या निबंधाची खरी व्याख्या आज कळते आहे .
गुण मिळवण्यापुरताच काय तो पाणी वाचवण्याचा अभ्यास .
पाणी वाचवण्याच्या निरनिराळ्या पद्धती ह्या फक्त वही मध्येच मर्यादित राहिल्या .
माझ्या कडून सुद्धा काही वेळी पाण्याचा अपव्यय होतो पण आजपासून तो कटाक्षाने टाळणार.
कालच एका मराठी कार्यक्रमात एका व्यक्तीचा उल्लेख केला गेला "अबीद सुरती " म्हणून जे वयाच्या ८० व्या वर्षी मुंबई मधील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन, परवानगी घेऊन ,आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्लंबर घेऊन नळांची गळती दुरुस्त करतात .खूप कौतुक वाटले ऐकून .
जर वयाच्या ८० व्या वर्षी ते एवढा विचार करू शकतात तर आपण का नाही ?
कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात हि स्वतःपासून करावी .
दैनंदिन जीवनात आपण किती पाण्याचा अपव्यय करतो . 

आंघोळीपासून, कपडे भांडी , गाडी धुणे हे आणि बरंच काही .
हे आपण टाळू शकतो .
सध्या लग्न कार्य किंवा इतर समारंभात पाण्याचे बंद ग्लास दिले जातात आणि मग कित्येक वेळा २ घोट पिउन ते फेकून दिले जातात . 

किती प्रमाणात पाणी वाया जाते . 
हेच जर का आपण बंद पाण्याचे नळ असलेले कॅन आणि ग्लास ठेवले आणि प्रत्यकाने गरजे इतकेच पाणी घेतले तर काही प्रमाणात आपण  पाण्याचा अपव्यय टाळू शकतो आणि स्वच्छतेची चिंता नाही . 

 भारतीय संस्कृतीमध्ये आपण गंगा , नर्मदा ,गोदावरी ,कृष्णा माई ह्यांना पवित्र मानतो , त्यांची पूजा करतो परंतु त्याच नद्यांचे होणारे आणि वाढते प्रदूषण हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे . 

आपण तलाव ,नदी समुद्र ह्यांच्या बाजूला निर्माल्यासाठी कलश ठेवलेले पाहतो परंतु तरीही काही चुकीच्या अंधश्रद्धेपोटी कित्येक जण पाण्यामध्येच विसर्जन करतात. 

इको -फ्रेंडली ऐवजी प्लास्टर ऑफ परिस च्या मुर्त्या वापरून आपण जल प्रदूषणात भर घालतो .
होळी - रंगपंचमी ह्या दिवशी कित्येक लिटर पाणी आपण वाया घालवतो .
ह्याचा अर्थ सण साजरे करू नये असा नाही तर सुक्या रंगानी सुद्धा आपण होळी खेळू शकतो .पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न करता साजरे करणाऱ्या प्रत्येक सणाचा आनंद हा खूप लाख मोलाचा असेल .
कित्येकदा आपण आदल्या दिवशीचे पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देतो आणि ताजे पाणी भरतो परंतु हे करत असताना फक्त विचार करा कि अनेक गावांमध्ये एक हंडा पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागते.



आपण पाणी वाचवण्यासाठी नवनवीन तंत्र विकसित करतो पण ती प्रत्यक्षात उतरायला मात्र वर्षानुवर्षे निघून जातात . त्यापेक्षा प्रत्येकाने जर पाणी जपून वापरण्याचे ठरवले आणि पाण्याचा अपव्यय टाळला तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर पाणी बचत करू शकतो. झाडे लावण्यापासून ते कुपनलीकेपर्यंत अनेक पर्यायाने जल संवर्धन करता येऊ शकते . 
पाणी हा आज पृथ्वीवरील जीवनावश्यक घटक आहे.प्रत्येक जीवाला पाणी हे अत्यावश्यक आहे .हेच जर असेच सुरु राहिले तर पाण्यावरून पुढील काळात संघर्ष पहावयास मिळतील.त्यामुळे पाणी जपून वापरणे व पाण्याचा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.
आपण सगळीकडे स्त्री साक्षरता , प्रौढ साक्षरता मोहीम पाहतो . पण खऱ्या अर्थाने आता जल साक्षरता मोहीम राबविण्याची खरी गरज आहे .
आज जागतिक जल दिनानिमित्त आपण प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळण्याची प्रतिज्ञा करूया.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे "
-सुप्रिया नार्वेकर 

0 comments: